ब्रेकिंग न्यूज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा वित्त खात्याची जबाबदारी

राज्यपाल रमेश बैस यांच्या मंजुरीनंतर राज्य मंत्रिमंडळाचं बहुप्रतिक्षित खातेवाटप आज जाहीर झालं. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी हे खातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं. खातेवाटप जाहीर झाल्यावर अजित पवार यांनी लगेच कामकाजाला सुरुवात केली. 

यापूर्वी रविंद्र चव्हाण यांच्याकडे असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं छगन भुजबळ यांना देण्यात आलंय. 

अतुल सावेंकडे असलेल्या सहकार खात्याची जबाबदारी आता दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे आली आहे. अतुल सावे आता गृहनिर्माण, इतर मागास आणि बहुजन कल्याण खात्याचे मंत्री आहेत. 

हसन मुश्रीफ आता वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य खात्याचे मंत्री असतील. यापूर्वी ही जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे होती. 

गिरीश महाजन यांना ग्राम विकास, पंचायत राज यासह पर्यटन या नव्या खात्याची जबाबदारी असेल. पूर्वी हे खातं मंगल प्रभात लोढा यांच्याकडे होतं. 

सार्वजनिक उपक्रम असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याची नवी जबाबदारी दादाजी भुसे यांना मिळाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या खात्याचा कार्यभार होता.

संजय राठोड यांच्याकडे आता अन्न आणि औषध प्रशासन ऐवजी मृदा आणि जलसंधारण हे खातं आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या खात्याचा कार्यभार होता.

अब्दुल सत्तार आता कृषी ऐवजी अल्पसंख्याक विकास आणि औकाफ, पणन खात्याचे मंत्री असतील. कृषी खात्याची जबाबदारी आता धनंजय मुंडे यांना देण्यात आली आहे. 

धर्मराव बाबा आत्राम यांना आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं मंत्रीपद मिळालं आहे. यापूर्वी हे मंत्रीपद संजय राठोड यांच्याकडे होतं. 

आदिती तटकरे यांच्याकडे मंगल प्रभात लोढा यांच्याकडे असलेल्या महिला आणि बालविकास खातं देण्यात आलं आहे. 

अनिल पाटील मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री असतील. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी होती. 

राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गुलाबराव पाटील, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांच्याकडे असलेल्या खात्यांमध्ये मात्र कुठलाही बदल झालेला नाही.

Back to top button
error: Content is protected !!
%d bloggers like this: