कथा-कविता-साहित्यमहिला जगत

‘बाईपण भारी देवा’ खरच भारी

लेखिका- आरती कुलकर्णी (रत्नागिरी)

‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा सध्या ‘भारी ‘ ठरत आहे. सगळीकडे या सिनेमाचा बोलबाला आहे. दिवसेंदिवस याची लोकप्रियता वाढतच चालली आहे.अमेरिकेत ही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे .सोशल मीडिया वर ही याचीच चर्चा आहे. विशेषतः महिला वर्गानी या सिनेमाला जास्त गर्दी केली आहे. अगदी गटागटाने नटूनथटून , नऊ वारी साडी नेसून, गॉगल घालुन,नाकात नथ घालुन या सिनेमाला त्या हजेरी लावत आहेत .या निमित्तानं का होईना एकत्र येऊन सगळ्या जणी हसतायेत,गप्पा मारतायेत, एकत्र फोटो काढतायेत ,धमाल करतायेत हेच खुप आहे.


आम्ही सुद्धा हा सिनेमा बघुन आलो. खुप दिवसांनी मैत्रिणी भेटल्या खुप गप्पा झाल्या, हसलो, सुखदुःखाची देवाणघेवाण झाली. सगळी मरगळ, थकवा कुठल्याकुठे निघुन गेला. नेहमीच्या चाकोरीबद्ध आयुष्यात असाही एक उनाड दिवस असावा.

हा सिनेमा मुळातच स्त्रीप्रधान असल्यामुळे त्यातली प्रत्येक पात्र बायकांच्या अगदी जवळची वाटतात .म्हणजे स्वतःची ताकद ओळखून प्रसंगी एकटं राहुन स्वतःच्या पायावर उभ राहू शकतो असा आत्मविश्वास बाळगणारी,काहीही कामधंदा करत नसलेल्या नवऱ्याचे डोंगरा एवढं कर्ज फेडण्यासाठी कंबर कसणारी, साधी साधी म्हणत आपली मन जिंकणारी आणि सुनेची आवड बघुन तिला प्रोत्साहन देणारी तिला आपली मुलगी मानणारी, मनमोकळेपणे व्यक्त न होता वर्षानुवर्ष मनात अढी बाळगणारी, कुढणारी, ठसकेबाज, काहीही न बोलता नजरेतूनच आपलं म्हणणं पोहोचवणारी,मीच सगळ्यात बेस्ट आहे असं म्हणणारी . सहनशील अशी अनेक स्त्रियांची रूप आपण आपल्या घरात किवा आजूबाजूला बघतो. त्यामुळे प्रत्येक पात्र आपल्या घरातलच आहे असं वाटतं .

आपण म्हणतो की,कुणाचं कुणा वाचून अडत नाही हे जरी बरोबर असलं तरीही, आयुष्याच्या काही कठीण प्रसंगी नात्यांची गरज भासते.पण गैरसमज, नकळत घडलेली एखादी गोष्ट यामुळं घट्ट असलेल्या नात्यात दुरावा येतो. आणि मग पुढे कधीतरी, कुठेतरी झालेल्या चुकीची जाणीव होते . आणि वाटतं की , त्याचवेळी आपण बोलायला पाहिजे होत. विनाकारण अहंकार सांभाळत बसलो. त्यामुळे वेळीच आपला इगो बाजुला ठेवून नात्यात कुठे कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
नात्याकड ,आपल्या माणसाकडे, स्वतःकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. बिघडलेली नाती दुरुस्त करण्याचा एक मोठा संदेश या सिनेमातून मिळतो.

स्त्रियांच्या अगदी लहान लहान भावना टिपलेल्या आहेत. चारचौघी त बोलला न जाणारा विषय म्हणजे रजोनिवृत्ती अर्थातच menopause. या काळात तिच्यात आंतरिक, भावनिक बदल होत असतात. पण ती बोलून दाखवत नाही.इतक्या वर्षाचं फिरणारं हे चक्र चाळिशीच्या उंबरठ्यावर अचानक येवुन थांबत .आणि तिला म्हणत, तु ही थोडा pause घे.आयुष्याची इतकी वर्षे फक्त दुसऱ्यांसाठी करत आलीस .आता स्वतःकडे लक्ष दे. स्वतःसाठी जग. प्रत्येक स्त्रीने मोकळं होण खुप गरजेचे आहे. हे लक्षात येते.


श्रावण महिना आला की, सणाची रेलचेल सुरु होते. त्यात सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर. पुर्वी चूल आणि मुल इतकंच आयुष्य असलेल्या बायकांना हळदीकुंकू, मंगळागौर सणा वेळीच बाहेर पडायला मिळायचे. श्रावणाच्या या वातावरणात अगदी जोशाने आणि उत्साहाने मंगळागौरीचे खेळ खेळले जायचे. पण हल्ली गृहिणीच्या व्यस्त जीवनामुळे याच प्रमाण थोड कमी झालंय.आणि बाहेरील संस्कृतीला सहजपणे स्वीकार करणाऱ्या आजच्या पिढीला आपल्या संस्कृती च दर्शन घडवण ही काळाची गरज आहे. आणि हे काम त्यांनी सुरेखपणे दाखवलय. मंगळागौरीचे गाणं खुप हीट झालंय. हे सादर करताना त्यांची कमाल ऊर्जा आणि उत्साह बघुन खुप भारी वाटतं.
या चित्रपटातल्या ज्या गोष्टी मला भावल्या त्या तुमच्यासमोर मी मांडल्या.असे अनेक सिनेमे येतात जातात. त्यातलं काय घ्यायचं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.एक मात्र नक्की या सिनेमाच्या निमित्ताने बायकांचं ‘भारी ‘पण अजुन एकदा सिध्द झालंय.

Back to top button
error: Content is protected !!
%d bloggers like this: