ब्रेकिंग न्यूज

विधानसभेत ४१ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर

विधानसभेत आज ४१ हजार २४३ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. विविध योजनांसाठी पुरवणी मागण्यांमधे तरतुदी केल्या आहेत. त्यात शेतकरी सन्मान योजना, साखर कारखान्यांना मदत, शेतकरी कर्ज परतफेड योजना आदींचा समावेश आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. राज्यातल्या विकास निधीच्या वाटपात २०१९ ते २२ या काळात जे धोरण राबवलं गेलं त्यात कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे असमान निधी वाटप होत असल्याची तक्रार चुकीची आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यावर विरोधकांनी गदारोळ केला. यानंतर पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. निधी वाटपात कुणावरही अन्याय होणार नाही, असं पवार यांनी सांगितलं. त्यांच्या उत्तराला विरोधी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला, आमच्या मतदारसंघातल्या लोकांचा काय दोष आहे, आम्हाला निधीची आवश्यकता आहे तो द्या, अशी मागणी नाना पटोले यांनी विनियोजन विधेयकाच्या वेळी केली. त्यावर दुसऱ्याकडून सकारात्मक प्रतिसादाचा अपेक्षा करणाऱ्या लोकांनी आपला कार्यकाळही पहावा, असं अजित पवार म्हणाले. हे विधेयक मंजूर होताच विरोधकांनी सभात्याग केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता त्यांच्यासाठी असलेल्या चांगल्या योजनांना विरोधकांनीही समर्थन द्यावं, असं आवाहन कृषी मंत्री मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत आज केलं. आगामी काळात शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, आणि पुढील काळात शेतकऱ्याच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांनी स्वतंत्रपणे मांडलेल्या शेतकरी आणि त्यासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात झालेल्या चर्चेला आज सकाळच्या सत्रात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज उत्तर दिलं. ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे, भविष्यात यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील. जास्तीत जास्त गावातल्या शेतकऱ्यापर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, अशी माहिती मुंडे यांनी दिली. राज्यात जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी 5 हजार गावांचा समावेश करण्यात येत असून, जलपातळी वाढण्यास नक्कीच याची मदत होईल. मराठवाड्यातल्या पाण्याचे दुर्भिक्ष संपावे, यादृष्टीने वॉटर ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!
%d bloggers like this: